Monday 14 May 2012


भिक्षांदेही....

लई नाय सांगण
जास्त नाय मागण
आनंदाच वाण कधी 
लुटू तरी...

चिमणीची चिव चिव
पाखरांची किलबिल
पानांची सळसळ कधी 
ऐकु तरी...

मातीत घालू पाणी 
कालवू दोन्ही हाती
एखादा आकार चिमुकला 
घडवू तरी...

उन्हाचा कवडसा 
पाडून खोलीभर फिरवा
भिंगान पेपर कधी 
जाळू तरी...

मुंग्याची रांग
तिचा करून पाठलाग
चिमुटभर साखर तिथे 
ठेवू तरी...

काडेपेटीत भुंगा
पकडून ऐकु 
पारम्ब्याना झोका कधी 
खेळू तरी...


आभाळात रांगोळी
सांजला कोण काढतं
छकूलीच कोडं कधी 
सोडवू तरी...

गाईला थोपटा
मनिला कुरवाळा
भूभू ला शेकह्यांड कधी 
करु तरी...

सोसायटीत आजी
असते एकटी एकाकी 
तिच्या घरी जाऊन गोष्टी कधी 
ऐकु तरी...

पलीकडचे आजोबा
एकटेच असतात उदास 
मधुबाला अन नूतन चे विषय कधी 
काढू  तरी....

शाळेत नसते मेंदी 
अन नेलपेंट बी 
छकुलीशी भातुकली कधी 
खेळू तरी...

कोपर्यात पडलेली ट्युबलाईट 
कवाधरन  खुणावतेय
खळ खट्याक अचानक कधी
करू तरी...

'भ' ची बाराखडी
लैच भारी हाये
अधून मधून उजळणी कधी
करु तरी...

गावाबाहेरचे काजवे
तळ्यावरच्या भाकऱ्या 
टेकडी वरून झोपलेले शहर कधी 
बघू तरी...

आरशातील माणूस
आपल्याशी बोलू बघतोय 
त्याला नुसत्या वाकुल्या कधी 
दाखवू तरी....

क्यारमच्या सोंगट्या 
धूळ खात पडल्यात 
क्वीन वरून खोट कधी 
भांडू   तरी...

ढगात असतोय समिंदर
अन समिंदरात ढग
लपाछपीत खोट आउट कधी  
होऊ  तरी....

बुजगावण काय फक्त
शेतातच असतया ?
सवतालाच हा प्रश्न कधी
विचारु तरी....

फेसबुक च्या फार्मविलीवर
लई घुमशान व्हतय 
पार एखाद झाड खरच लावून
वाढवू तरी...

आनंदाचा झरा 
आत आपल्या वाहतोय
राडा रोड वरचा कधी
काढू तरी...

आनंदाचा कंद 
आहे आपल्या दारी
अधून मधून पाणी त्याला कधी 
घालु तरी....

अपडेट वरून तुझ्या 
लई भारी वाटतंय पण 
टपरीवर भेटून मोकळ्या गप्पा कधी 
मारु तरी...

बिझी लाइफ लई मस्त
काम फार मन तणावग्रस्त 
वेळात वेळ काढून कधी
जगू तरी...

ब्यान्कच पासबुक फुगवायाच असो 
किंवा असो हातातोंडाशी गाठ 
पण आनंदच रिकरिंग छोट
उघडू तरी...

सुखी माणसाचा सदरा 
जगात कुठंच नाय मित्रा
पण आनंदाचा होमवर्क कधी
करु तरी......

लई नाय सांगण
जादा नाय मागण
पण एवढी तरी भीक्षा कधी 
घाला तरी...

आनंदाचा होमवर्क कधी
करु तरी...
आनंदाचा होमवर्क कधी
करु तरी...

- आपला अमर 

No comments:

Post a Comment